latest Post

In the World of Blogs

Dear Friends, 

As I had published in my last blogpost I am publishing the very first article of my series in daily Pratyaksha that was published on the subject of 'Blogs'. This article was published on 12th November 2010. Though the article is old, still it hold the same importance and significance as on date. Rather the importance of blogs has all the more increased. Following is the article: 


’ब्लॉग’च्या की दुनियेत 
- मिहिर नगरकर

ह्या संगणकाच्या युगात जिकडे मुलं व पालक एकमेकांशी घरात कमी पण इंटरनेट व जास्त बोलतील अशी पाळी येऊ शकेल अशी वेळ ओढावली आहे व जिकडे लोक एकमेकांकडे कमी पण इंटरनेटवर आपले मन जास्त मोकळे करु लागले आहेत तेथे सोशल नेटर्वकिंग संकेतस्थळांचे (websites) महत्त्व स्वाभाविकच ठरतं. म्हणूनच ह्या लेखातून आपण ’ब्लॉग’ ह्या अत्यंत लोकप्रिय व उपयोगी विषयाबद्दल जाणून घेणार आहोत.

१७ डिसेंबर १९९७ रोजी ’ब्लॉग’ हा शब्द पहिल्यांदा जॉर्न बार्गर यांनी सहजपणे वापरला. ब्लॉग (Blog) हा शब्द वेब (Web) आणि लॉग (Log) ह्या दोन इंग्रजी शब्दांना जोडून बनविण्यात आला होता. ब्लॉग म्हणजे कोणत्याही विशेष तांत्रज्ञानिक ज्ञानाशिवाय बनवता व वापरता येण्या सारखे वेबपेज जे संकेतस्थळाचे काम करु शकते. ह्यावर आपण महिती, चित्र, व्हिडीओ, दस्तावेज, इत्यादी प्रकाशित करु शकतो. ज्या नेटकरांचा स्वतःचा ब्लॉग असतो त्यास ’ब्लॉगर’ असे म्हटले जाते. सध्याच्या इंटरनेटच्या युगात संपूर्ण जगाशी व जगातील प्रत्येकाशी थेट संर्पक ठेवण्याचे ब्लॉग पेक्षा दुसरे उपयोगी व ते ही मोफत असे साधन नाही.

ब्लॉग बनवण्यासाठीचे सर्वात सोपे व मोफत संकेतस्थळ हे ’गूगल’ चे ’ब्लॉगर’ (www.blogger.com) यास मानले जाते. ब्लॉगर बरोबरच वर्डप्रेस (www.wordpress.org) ही असेच एक संकेतस्थळ आहे. त्यामुळेच कदाचीत नवखे ब्लॉगर्स हे ’ब्लॉगर डॉट कॉम’ वापरण्यास पसंती देतात. पण सॉफ्टवेअर कोडिंगचे जाणकार हे जास्त वेळा वर्डप्रेसला पसंती देताना पाहिले गेले आहेत. ह्याचे कारण असे की वर्डप्रेस हे ब्लॉगचा सोर्सकोड (संगणकाच्या भाषेतील सॉफ्टवेअर प्रोग्राम) मोफत देते तर ’ब्लॉगर डॉट कॉम’ सोर्सकोड देतच नाही. ह्या सोर्सकोड मुळे आपण आपल्या ब्लॉगमध्ये तात्रिक बदल करण्यासाठी आपल्या होस्टींग संकेतस्थळावर अवलंबून न रहाता स्वतःच करु शकतो. ह्या दोन संकेतस्थळांव्यतिरिक्त ही अनेक संकेतस्थळे आपल्याला मोफत ब्लॉग बनवण्याचे व्यासपीठ पुरवतात. हे ब्लॉगस बनवण्यासाठी व सांभाळ्ण्यासाठी इंटरनेटवर काही ब्लॉग मदत पुस्तिका (Help Manuals) मोफत उपलब्ध आहेत. त्याशिवाय आपली ब्लॉगची होस्टींग संकेतस्थळेही ही माहिती ह्या अशा पुस्तिकांच्या माध्यमातून मोफत उपलब्ध करुन देतात. ह्या पुस्तिका समजण्यास अगदी सोप्या व विस्तृत असतात. त्यामुळे ब्लॉग बनविण्याचे काम अगदी सहज व पटकन होते.

ब्लॉग किंवा कोणत्याही वेबपेजच्या सर्च इंजिन (उदा: गूगल, याहू, बिंग, एम.एस., इत्यादी) कडून शोध घेऊन ते प्रर्दशित करणे हे संपूर्ण पणे त्या वेबपेजच्या सर्च इंजिनसच्या अनुक्रमावर (search engine ranking) अवलंबून असते. आपल्या ब्लॉगला यशस्वी व लोकप्रिय करण्यासाठी हे सर्च इंजिन रॅंकिंग वाढवणे व राखणे हेच गरजेचे असते. शिवाय आपल्या ब्लॉगचा खरा हेतू जो महितीचा प्रचार व प्रसार (कोणत्याही विषयाची, स्वतःची, कोणत्याही व्यक्ति किंवा संस्थेची, इत्यादी) तेव्हाच साध्य होतो जेव्हा सर्च इंजिन्स्‌मध्ये इतर नेटकरांना आपला ब्लॉग शोधता येण्यास व सापडण्यास सोपे जाते. ह्यासाठीच आपला ब्लॉग नियमित अद्ययावत (update) ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे व जवळ-जवळ ही रॅंकिंग वाढवण्याची गुरुकिल्लीच आहे. शिवाय रॅंकिंग मिळवण्यासाठी त्यावर जास्तीत जास्त वाचकांना (visitors) आर्कषित करणे व खिळबून ठेवणे ही गरजेचे असते. त्यासाठी ब्लॉग आर्कषक बनविण्यासाठी त्याचा बॅकग्राऊडचा रंग-ढंग, चित्र (image), साचा (template) व त्याचे आकृतिबंध (layout) हे दिलेल्या पर्यायांमधून आपण निवडू शकतो. त्याशिवाय ब्लॉगमध्ये आपण नव-नवीन साधने (gadgets) वापरु शकतो. ह्या गॅजेटस चा उपयोग करुन आपण आपल्या ब्लॉगला तर सुशोभित करु शकतोच, त्याशिवाय आपल्या ब्लॉगचे वेळोवेळी विश्‍लेषिकरण करुन त्यानुसार आपल्या ब्लॉगमध्ये बदल व सुधारणा घडवून आणू शकतो. अनेक गॅजेटस्‌ ही आपल्या ब्लॉगच्या वाचकांरोबर संवाद साधण्यास व त्यांची मते जाणून घेण्यास आपल्याला मदत करतात उदा: कोणत्याही प्रश्‍नावर जनमत सर्वेक्षणाचे (opinion poll) गॅजेटस्‌चा. 

ब्लॉगसच्या ह्याच क्षमतेमुळे आज हे ब्लॉगस चीन, इजिप्‍त, इराण, सुदान, साऊदी अरब, उत्तर कोरिया, ब्रम्हदेश (म्यानमार), इत्यादी हुकूमशाही देशांमधील जनतेच्या शोषणाच्या विरुध्दचा आवाज बनले आहेत. ह्याच ब्लॉगर्सच्या माध्यमातून ही शोषित जनता जगातील इतर देशांमधील लोकांशी, प्रसार माध्यमांशी, मानवाधिकार संघटनांशी, दबाव गटांशी संर्पक ठेवून ह्या दडपशाही विरुध्द थेट आंरराष्ट्रीय पातळीवर आपला आवाज पोचवित आहेत. ज्यावेळेस चीनच्या तिबेट व झिंजीयाँग या प्रांतात दंगली उसळल्या होत्या त्यावेळेस तेथील जनतेने चीनी सरकारची दडपशाही, सूडतंत्र व निर्दयता ह्या ब्लॉगसच्या माध्यमातूनच सार्‍या जगासमोर मांडली होती जी गुप्‍त राखण्याचा चीन  सरकार आटोकाट प्रयत्‍न करत होती व ह्या खुलास्यामुळेच चीन सरकारवरील आंतरराष्ट्रीय दबाव वाढून तेथील जनते वरील अत्याचार कमी झाले.

हल्ली मोठ-मोठ्या कंपन्याचाही आपले आंतरिक ब्लॉगस बनवण्यावर कल दिसून येत आहे. ह्या आंतरिक ब्लॉग्स्‌मध्ये कंपनीतील कोणताही कर्मचारी आपली मते, सुविचार, व्यवसायाशी निगडीत नव-नवीन विचार व कार्यपध्दती, तक्रारी, इत्यादी प्रकाशित करु शकतो व हे सर्व फक्त कंपनीमधिच पण प्रत्येक कर्मचारी वाचू ही शकतो व त्या मुद्यावर आपले मत ही मांडू शकतो. ह्यामुळे कार्यालयीन पारर्दशकता ही वाढते व नव-नवीन विचारांना व कार्यपध्दतींना दिशा मिळून त्यांचे एखाद्या लाभदायक व हितकरी परियोजनेत (Project) रुपांतरण होते. ह्या आंतरिक ब्लॉगसकडे निरंतर सुधार प्रणाली किंवा (Continual Improvement System)चा भाग म्हणूनही पाहिले जाऊ शकते.

हल्ली मोठ-मोठ्या व प्रसिध्द व्यक्त्ती ही त्यांच्या चाहत्यांपर्य़ंत, मतदारांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत व  अगदी टीकाकारांपर्यंत पोहोचण्यासाठी हे ब्लॉगसचे माध्यमच निवडत आहेत. आज बराक ओबामा (अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष), विनीत नायर (एच.सी.एल टेक्‍नॉलॉजीस चे प्रमुख कार्यकारी अधिकारी), ओमर अब्दुल्ला, बरखा दत्त, अमिताभ बच्‍चन, शोभा डे, शेखर कपूर, नॅन्सी पेलोसी (अमेरिकी संसदेच्या माजी सभापति), इत्यादी प्रख्यात व्यक्तिंचे ब्लॉगस आहेत.

ब्लॉग हे अत्यंत ज्वलंत व लोकप्रिय माध्यम आहे त्यामुळे त्याचा वापर काळजी पूर्वक करणे ही प्रत्येक ब्लॉगरची सामाजीक व नैतिक जवाबदारी आहे. तसे न केल्यास सामाजिक व्यवस्था नक्‍कीच बिघडू शकते. त्याशिवाय जर आपल्या ब्लॉग मध्ये आपण कोणाच्या बौद्धिक संपदा अधिकाराचे (IPR किंवा Intellectual Property Rights) उल्लघन केले, किंवा कोणाच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्‍न केला तर आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे आपल्या ब्लॉगवर प्रकाशित केली जाणारी महिती, चित्र, व्हिडीओ, दस्तावेज, इत्यादी हे कोणाच्या बौद्धिक संपदा अधिकाराचे उल्लंघन करणारे नसावेत. समजा जर दुसर्‍या कुठल्या संकेतस्थळावरुन किंवा अन्य कोणत्याही स्रोता कडून  आपण महिती, चित्र, व्हिडीओ, दस्तावेज, इत्यादी मिळविले असल्यास तशी रसीद (acknowledgement) आपल्या ब्लॉगमध्ये जरुर द्यावी. त्याशिवाय जसा कोणत्याही गोष्टीचा चांगला व वाईट वापर केला जातो तसाच ब्लॉगसचा ही गैरवापर केला जातो. अनेक ब्लॉगसवर अश्‍लिल साहित्य, अशुभ विद्यांची महिती, प्रतिबंधित व अतिरेकी माहिती पुरविली जाते.
  
तर अशी आहे ही ब्लॉगची दुनिया! संवाद साधण्यासाठी, स्वत:चं मत मांडण्यासाठी इतरांना आपलं मत मांडण्यासाठी उपयुक्त ठरणारं हे ब्लॉगचं माध्यम अनेक चांगल्या गोष्टींना, विचारांना, चालना, देणारं, ठरु शकतं. आपण त्याकडे किती गांभीर्याने पाहतो, आणि त्याचा कसा वापर करतो, यावर बरंच काही अवलंबून असतं. आपल्या सर्वांना बोलायला फार आवडतं. नव्हे ती आपली गरजच असते. ब्लॉगच्या माध्यमातून एकाच वेळी अनेक जणांशी बोलू शकतो, आपले विचार माडू शकतो आणि इतरांचे विचार, मते जाणून घेऊ शकतो. तसेच ब्लॉग्जचा उपयोग कोणत्याही विषयाची, स्वत:ची, कोणत्याही व्यक्तिची किंवा संस्थेची माहिती देण्याकरिता, आपल्या विचारांचा प्रचार व प्रसार अत्यंत सुलभतेने करण्यासाठी होऊ शकतो. याचा लाभ आपण घ्यायलाच हवा, नाही का?

१२ नोव्हेंबर २०१०.

About Mihir Nagarkar

Mihir Nagarkar
Recommended Posts × +

0 comments:

Post a Comment